
गोकुळ शिरगाव (सलीम शेख): सांगवडे (ता. करवीर) येथे वारस नोंदणी करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याप्रकरणी तलाठी आणि कोतवाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.संशयित आरोपींची नावे
अविनाश मधुकर कोंडीग्रेकर (वय ४०), तत्कालीन तलाठी, सांगवडे सर्जेराव बंडा कुंभार, कोतवाल, सांगवडे
तक्रारदाराच्या आजोबांच्या नावावर असलेल्या जमिनीच्या सातबारा पत्रकी त्यांचे नाव वारस म्हणून लावण्यासाठी तक्रारदार तलाठी कार्यालयात गेले होते. तलाठी कोंडीग्रेकर यांनी कोतवाल सर्जेराव यांना भेटण्यास सांगितले. कोतवाल कुंभार यांनी दोघांसाठी ५००० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ३००० रुपये देण्याचे ठरले.
याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. तलाठी कोंडीग्रेकर यांच्या सांगण्यावरूनच कोतवाल कुंभार यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. दोघांनीही लाच मागणीत सहभाग घेतल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण, सचिन पाटील, कृष्णा पाटील, चालक सहा. पो. फौ. गजानन कुराडे, चालक पोकों प्रशांत दावणे यांच्या पथकाने केले.
लाच मागणी अथवा गैरव्यवहार संबंधी कोणतीही माहिती असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२०२१ वर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.