गोकुळ शिरगाव येथे शासकीय धान्य वितरण ट्रकचा अपघात!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूरहून चंदगड जाणारा मालवाहतूक ट्रक क्रमांक MH 09 Q 6783 गोकुळ शिरगाव येथे आज सकाळी 11 च्या सुमारास अपघात झाला. हा शासकीय धान्य वितरण करणारा तांदूळ वाहतूक ट्रक होता. ट्रकचालक अनिल रामा भोसले (वय 59, राहणार टेंबलावाडी) हे ट्रक चालवत असताना सुदर्शन पेट्रोल पंपाच्या समोर ट्रकचा टायर अचानक फुटला. त्यामुळे ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक दुभाजकाला धडकला.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रकचे चाक तुटून पडले आणि काही स्पेअर पार्ट्सचे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंगचे तुषार पवार, राष्ट्रीय महामार्गाचे उपनिरीक्षक गायकवाड आणि गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने कार्यवाही करत ट्रक मधील धान्य दुसऱ्या ट्रक मध्ये भरून अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला काढला. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.
या अपघातामुळे एन एच फोर मार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने कार्यवाही केल्यामुळे वाहतूक लवकरच सुरळीत झाली.
या अपघाताबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.