पर्यावरणाचा जागर भित्तीचित्र महोत्सव कागलमध्ये संपन्न

कागल (सलीम शेख ) : कागल शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छता आणि सौंदर्याकरण अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२५ आणि ‘माझी वसुंधरा अभियान ०५’ अंतर्गत नगरपालिकेच्या वतीने राज्यस्तरीय भित्तीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध जिल्ह्यांतील ४० हून अधिक प्रसिद्ध चित्रकार सहभागी झाले आहेत. शहरातील संत रोहिदास शाळेच्या संरक्षण भिंतीवर सुंदर आणि आकर्षक चित्रे साकारली जात आहेत.
हे चित्रे साकारताना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
शहराच्या सौंदर्यात भर घालणे आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरणाचे संदेश देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेत चित्रकला शिक्षक, ललित चित्रकला, आर्ट डिप्लोमा, एटीडी आणि भिंती चित्रकला यांसारख्या विविध क्षेत्रांतील कलाकारांचा समावेश आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबई, इस्लामपूर, सांगली आदी भागातून ४० हून अधिक स्त्री-पुरुष चित्रकार सहभागी झाले आहेत. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी येथील कला महाविद्यालयांतील तज्ज्ञ परीक्षक म्हणून काम करत आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांकास १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ५० हजार रुपये आणि दहा जणांना पाच हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेचा प्रारंभ कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या हस्ते झाला. यावेळी आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, आशिष शिंगण, बादल कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.