कोल्हापुरात महिला दिनाचा उत्साह; राजे छत्रपती संभाजी विद्यालयात विशेष कार्यक्रम

कोल्हापूर (सलीम शेख): कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजे छत्रपती संभाजी विद्यालय क्रमांक ६६ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला सक्षमीकरण आणि कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार या विषयांवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना पाटील यांनी महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले, तर सीआयडी विभागाच्या हवालदार शारदा परळे यांनी मुलांवर संस्कार आणि पालकांच्या वर्तणुकीबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. उखाणे स्पर्धा, फुगे उडवणे, फुगे फोडणे, तळ्यात मळ्यात यांसारख्या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि मनसोक्त आनंद लुटला.
शाळेतील महिला शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक संभाजी चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर जितेंद्र मोरे यांनी आभार मानले. कुंभार मॅडम आणि सेविका सूर्यवंशी मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.