HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाच! कोणत्या वाहनधारकांचं फिटमेंट शुल्क होणार माफ जाणून घ्या!

मुंबई: राज्यातील जुन्या वाहनांसाठी (HSRP) प्लेट बसवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या सोसायटी किंवा इमारतीतील २५ पेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्र नोंदणी केली, तर अधिकृत एजन्सी त्या सोसायटीत जाऊन HSRP प्लेट बसवणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकरणांमध्ये वाहनधारकांना फिटमेंट शुल्क आकारले जाणार नाही. २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनांसाठी HSRP प्लेट बसवण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी वाहनधारकांना घरपोच सेवा हवी असल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात होते. दुचाकीसाठी 125 रुपये आणि चारचाकीसाठी 250 रुपये असे फिटमेंट शुल्क होते. मात्र, नवीन निर्णयानुसार सोसायटी नोंदणी केल्यास हे शुल्क पूर्णतः माफ होईल.
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले की, वाहनधारकांना नंबर प्लेटसाठी केंद्रांवर जाण्याचा त्रास कमी व्हावा आणि गर्दी नियंत्रित रहावी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. HSRP साठी निश्चित दर वाहनाच्या प्रकारानुसार ठरवले गेले आहेत – दुचाकीसाठी 531 रुपये, तीनचाकीसाठी 590 रुपये आणि चारचाकी/व्यावसायिक वाहनांसाठी 879 रुपये . राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना तीन विभागांमध्ये विभागून, स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून HSRP बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १८ लाखांहून अधिक वाहनधारकांनी HSRP घेतली असून, दररोज सरासरी १०,००० नवीन नोंदण्या होत असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. HSRP प्लेट बसवण्यास विलंब केल्यास वाहन धारकांना दंड भरावा लागू शकतो, त्यामुळे वाहनधारकांनी त्वरित नोंदणी करून ही प्रक्रिया पूर्ण करावी. सोसायटीच्या माध्यमातून सामूहिक नोंदणी केल्यास अतिरिक्त खर्च वाचणार आहे.