कागलमध्ये डेंग्यूसदृश्य आजाराने २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू!

कागल (सलीम शेख): कागल येथील २४ वर्षीय तरुणी आद्या विश्वजीत संकपाळ हिचा डेंग्यूसदृश्य आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. आद्या ही चायनीज भाषेची अभ्यासक आणि भूगर्भशास्त्रात बीएससी पदवीधर होती. तिच्या निधनाने कागल परिसरात शोककळा पसरली आहे.
आद्याला गुरुवारी अशक्तपणा आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डेंग्यूसदृश्य लक्षणे दिसत असल्याने डॉक्टरांनी तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. कोल्हापूरमध्ये उपचार सुरू असताना तिची प्रकृती स्थिर होती. मात्र, शनिवारी अचानक तिचे यकृत आणि किडनी निकामी झाल्याने तिची प्रकृती गंभीर झाली. रविवारी सकाळी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
आद्या ही सामाजिक कार्यकर्त्या स्वरदा संकपाळ आणि विश्वजीत संकपाळ यांची कन्या होती. तिने छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून भूगर्भशास्त्र विषयात बीएससी आणि चायनीज भाषेचा डिप्लोमा पूर्ण केला होता. चार दिवसांनंतर ती मुंबईतील एका कंपनीत नोकरीला रुजू होणार होती. मात्र, नियतीने तिच्यावर घाला घातला.
आद्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि चुलते असा परिवार आहे. तिच्या निधनाने संकपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी (दि. २४) रक्षाविसर्जन करण्यात आले.