कोल्हापूर जिल्ह्यात जंगली प्राण्यांचा धुमाकूळ, शेतकऱ्यांवर हल्ला!

कोल्हापूर (सलीम शेख ): कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात जंगली प्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील परिते येथील प्रतीक पाटील आणि भुतलवाडी येथील अप्पा अकाराम भुतल या दोन शेतकऱ्यांवर रात्री गव्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रदीप नरके यांनी तातडीने सीपीआर रुग्णालयात धाव घेऊन जखमी शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली. दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आमदार नरके यांनी जखमी शेतकरी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला, तसेच डॉक्टरांना योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यातील वाढत्या वन्यजीव-मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, आमदार नरके यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि जीविताचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.