कोल्हापुरात शिव-शंभू-फुले-शाहू-आंबेडकर सन्मान परिषद, इंद्रजित सावंत यांचा बहुजन नायक म्हणून सन्मान!

कोल्हापूर (सलीम शेख) : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक उद्गार काढल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात दहा संघटनांनी एकत्र येत शिव-शंभू-फुले-शाहू-आंबेडकर सन्मान परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा बहुजन नायक म्हणून सन्मान करण्यात आला.प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिविगाळ केली आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक उद्गार काढले. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. कोरटकरला सरकारने पोलिस संरक्षण दिले होते, पण तो पोलिसांना चकवा देत फरार झाला. सुमारे एक महिना तो पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. या काळात तो अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता?. तसेच पोलिसांतील काही मंडळी त्याला मार्गदर्शन करत होती?अशी माहिती समोर आली होती.
या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिव-शंभू-फुले-शाहू-आंबेडकर सन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कॉ. गोविंदराव पानसरे, प्रा. एन. डी. पाटील यांच्यानंतर कोल्हापूरच्या वैचारिक नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत इंद्रजित सावंत यांचा बहुजन नायक म्हणून सन्मान करण्यात आला.
परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
शाहू स्मारक भवनाचे सभागृह खचाखच भरले होते आणि बाहेरही तेवढीच मंडळी होती. सर्व वक्त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्तपणे टाळ्या मिळत होत्या. अभिनेते किरण माने, ह.भ.प नितीनमहाराज पिसाळ (बीड) हे प्रमुख पाहुणे होते.
इंद्रजित सावंत यांचा सत्कार ही कोल्हापूरच्या सामाजिक इतिहासातील महत्त्वाची घटना इंद्रजित सावंत यांनी ‘छावा’ चित्रपटातील ऐतिहासिक तथ्यांच्या मोडतोडीवर भाष्य केले होते. त्यामुळे प्रशांत कोरटकर याने त्यांना शिविगाळ केली होती. या घटनेनंतर कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. इंद्रजित सावंत यांचा सत्कार ही कोल्हापूरच्या सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाची घटना ठरली. जेम्स लेन प्रकरण घडले तेव्हा अशाच प्रकारचा संताप व्यक्त झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेब यांच्या बदनामीमुळे शिवप्रेमी तरुण पेटून उठला होता. तसेच चित्र यावेळी दिसत होते.
सामाजिक चळवळीचा चेहरा बदलत असल्याचे द्योतक शाहू स्मारक भवनामध्ये जमलेल्या गर्दीत तरुण होते, तसेच अनेक जाणती मंडळी होती. श सरोजताई एन.डी पाटील, प्राचार्य डी. यू. पवार, व्यंकाप्पा भोसले, चंद्रकांत यादव, भारती पोवार, गणी आजरेकर, प्राचार्य टी. एस. पाटील, शिवाजीराव परुळेकर, कॉ. दिलीप पवार, सरलाताई पाटील, रवी जाधव, सुभाष देसाई, दगडू भास्कर अशी जुन्या काळातली मंडळी श्रोत्यांमध्ये आवर्जून उपस्थित होती. मंचावर सगळी तरुण पिढी होती. कोल्हापूरच्या सामाजिक जीवनातील हा बदल आवर्जून नोंद घेण्याजोगा आहे. कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीचा चेहरा बदलत असल्याचे हे द्योतक म्हणता येईल.