वाहतूकदारांना विनाकारण त्रास देऊ नये, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश!

कोल्हापूर (सलीम शेख): वाहतूकदारांमुळे सामाजिक स्वास्थ्य टिकण्यास मदत होते. समाजाच्या अनेक गरजा पूर्ण होण्यास मदत होते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक करू नये, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आ. चंद्रदीप नरके, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी-पाटील, लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, मल्हारी पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर पुढे म्हणाले की, १५ वर्षापुढील गाड्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार काम करू. तर वाहनाच्या ओव्हरलोडिंगबाबत आरटीओमार्फत जो अवास्तव दंड आकारला जातो आहे त्या दंडासंदर्भात आरटीओने फेरविचार करावा, अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी यावेळी केली.
या आढावा बैठकीत कागल येथील खाजगी आरटीओ चेक पोस्ट बॉर्डर बंद करावी, तावडे हॉटेल जवळील १३.५ जागा राज्य शासनाने ट्रक टर्मिनल्ससाठी आरक्षित केली आहे त्या जागेवर मनपाने त्वरित ट्रक टर्मिनल्स उभे करावे, ई-चलन पद्धत रद्द करावी तसेच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची अट स्थगित करावी किंवा त्याला मुदतवाढ द्यावी याचे गुजरात राज्याप्रमाणे नंबर प्लेटच्या विक्रीचे दर ठेवावे, महामार्ग पोलिसांना पेपर तपासणीचे दिलेले अधिकार रद्द करावे, अशा मागण्या लॉरी असोसिएशनच्यावतीने या बैठकीत करण्यात आल्या. या अनुषंगाने महामार्ग पोलीस, परिवहन विभागाची मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीसाठी मोटार वाहन निरीक्षक विजयसिंह भोसले, शंभूराजे पवार विशाल बागडे, लॉरी असोसिएशनचे सचिव हेमंत डिसले खजिनदार प्रकाश केसरकर यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक आदी उपस्थित होते.