पन्हाळा शिवस्मारकासाठी 10 कोटी रुपये मंजूर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!

कोल्हापूर (सलीम शेख) : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचा शासन निर्णय (जीआर) देखील जारी करण्यात आला आहे.
या निधीचा वापर पन्हाळा येथील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावाजवळील शिवस्मारकाच्या परिसराचा विकास करण्यासाठी केला जाणार आहे. परिसरात बगीचा, पदपथ आणि इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. या खर्चाचा 100% हिस्सा राज्य सरकार उचलणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मान्यतेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करेल. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शिवस्मारकासाठी 5 कोटी रुपये मंजूर केले होते, ज्यापैकी 1 कोटी रुपये खर्च झाले होते. मात्र, काम अपूर्ण राहिल्याने आमदार चंद्रदीप नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. शिंदे यांनी नगरपरिषदांना विशेष अनुदान या योजनेअंतर्गत पन्हाळा नगरपालिकेला हा निधी मंजूर केला.यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर,राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता,नगरविकास खात्याचे प्रधान सचिव गोविंदराज उपस्थित होते.
पन्हाळा किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.या स्मारकाच्या विकासामुळे पर्यटनाला चालना मिळेल.