तामगाव बैलगाडी शर्यत: हजारो बैलगाडी प्रेमींनी लावली हजेरी, मानकापूरच्या सचिन म्हाकाळे यांनी मारली बाजी!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : तामगाव येथील जगतगुरु संत तुकाराम महाराज (बीज) यात्रेनिमित्त बिरोबा माळावर आयोजित बैलगाडी शर्यत मैदानात मानकापूरच्या सचिन म्हाकाळे यांनी अवघ्या १८ मिनिट ४३ सेकंदात ८ कि.मी. अंतर पार करत ३१ हजार रुपयांच्या बक्षीसावर आपले नाव कोरले. तब्बल दहा वर्षानंतर बिरोबा माळावर लाखो शर्यत शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या अटी-तटीच्या शर्यतीचा क्षण अनुभवावयास मिळाला.
गेल्या महिनाभरापासून लाखो शर्यत शौकिनांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण केलेल्या व शर्यती शौकीन ग्रुपच्या वतीने ठेवलेल्या शर्यती आज लाखोंच्या उपस्थितीत पार पडल्या. विना लाठी-काठी जनरल बैलगाडी शर्यत स्पर्धेत अवघ्या १९ मिनिटे ९ सेकंदामध्ये दानोळीच्या बंडा खिलारे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. तर तृतीय क्रमांक खोत अण्णा (इंगळी) यांच्या गाडीने पटकावला.
सुमारे पंचवीस एकर परिसरातील बिरोबा, धनखडी माळरानावर बैलगाडी स्पर्धा पार पडल्या. ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, राधानगरी, हातकणंगले, यल्लूर सातारा, तासगाव आदी भागातून ११० बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी दीड ते दोन हजाराहून अधिक बैलगाडी शर्यती प्रेमींनी या ठिकाणी हजेरी लावली होती. यावेळी महेश जोंधळेकर, श्रीधर गवते, सुंदर कांबळे, राहुल पिंपळे, अमर गायकवाड, उदय शिंदे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व आजी माजी सदस्य, सरपंच, सर्व सोसायटी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बैलगाडी शर्यती विजेते:
* जनरल अ गट:
* प्रथम क्रमांक: सचिन म्हाकाळे
* द्वितीय क्रमांक: बंडा खिल्लारी
* तृतीय क्रमांक: खोत अण्णा
* जनरल ब गट पहिला गट:
* प्रथम क्रमांक: बंडा खिल्लारी
* द्वितीय क्रमांक: इंद्रजीत इनामदार (पलूस)
* तृतीय क्रमांक: प्रवीण डांगरे (इचलकरंजी)
* दुस्सा चौसा:
* पहिला: गोपी पाटील – तळसंदे
* दुसरा: विजय माने – दानोळी
* तिसरा: बंद खिलारी – दानोळी
* ओपन आडत:
* पहिला: गोपी पाटील – तळसंदे
* दुसरा: सचिन परीट – हातकणंगले
* तिसरा: धनाजी ढोले – आष्टा
* निस सावत्र:
* पहिला: स्वराज साळुंखे – राधानगरी
* दुसरा: संजय अण्णा – इदरगुच्ची (कर्नाटक)
* तिसरा: यशू धडस – सिद्धेवाडी