पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कागलमध्ये मुस्लिम समाजातर्फे तीव्र निषेध!

कागल (सलीम शेख ) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कागल शहरातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत तीव्र निषेध व्यक्त केला. सुन्नत मुस्लिम जमात, कागल आणि समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला, तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या दुःखद घटनेनंतर कागलमधील मुस्लिम समाजात शोक आणि संतापाची भावना पसरली आहे. निषेध सभेत सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांनी दहशतवाद्यांच्या या घृणास्पद कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी उपस्थितांनी देशाच्या एकतेसाठी आणि शांततेसाठी प्रार्थना केली.
सुन्नत मुस्लिम जमात, कागल च्यावतीने बोलताना म्हणाले, “पहलगाममध्ये जे घडले ते अत्यंत निंदनीय आहे. निष्पाप नागरिकांवर हल्ला करणे हे दहशतवाद्यांचे नामर्दाचे लक्षण आहे. या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”
या निषेध सभेत शहरातील अनेक मुस्लिम नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मगुरु सहभागी झाले होते. सर्वांनी एकमुखाने दहशतवादाचा विरोध केला आणि देशाच्या अखंडतेसाठी कटिबद्धता दर्शवली.