कोल्हापुरात उपमुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान; शक्तीपीठ महामार्ग विरोधकांना नजरकैदेत!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : दि. ५: आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीने आक्रमक भूमिका घेतली होती. समितीने उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून आपला विरोध दर्शवण्याचा निर्धार केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम १६८ नुसार संचारबंदी लागू केली होती.
या संचारबंदीच्या काळात पोलिसांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक आणि गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील (नेर्ली) तसेच सांगवडे गावातील शेतकरी प्रकाश पाटील यांना आज दिवसभर नजरकैदेत ठेवले. दोघांनाही आज सकाळी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
शक्तीपीठ महामार्गाला असलेला आपला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलनाची तयारी करत असलेल्या यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले. गावात या घटनेची दिवसभर चर्चा सुरू होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, नजरकैदेत असलेल्या प्रकाश पाटील (नेर्ली) आणि शेतकरी प्रकाश पाटील (सांगवडे) यांनी आपला दिवस पोलीस ठाण्यात पुस्तक वाचनात घालवला.शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या प्रमुख समन्वय नजरकैदेत ठेवल्याने या प्रकल्पाला असलेला विरोध अजूनही कायम असल्याचे दिसून आले. या कारवाईमुळे आंदोलक अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.