गोकुळ शिरगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात सुरू!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा व कला संस्कृती मंडळ, आंबिरा ग्रुप, महिला सन्मान परिषद आणि समस्त बौद्ध समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. ‘मी अशा धर्माला मानतो, जो स्वतंत्रता, समता आणि बंधुता शिकवतो’ या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांनी या सोहळ्याचा प्रारंभ झाला.
१४ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजता भीम ज्योतीचे आगमन झाले ज्योतीचे पूजन एम .एस पाटील केले आणि त्यानंतर सकाळी ८:३० वाजता गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. प्रतिमा पूजन नूतन राजन पाटील (उपसरपंच, ग्रा.पं. गोकुळ शिरगाव) यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शामराव पाटील, आश्विनी र. कांबळे, पूजा कृ. गुरव यांच्यासह आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ विशाल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०० वाजता प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम ‘हाक बाबांची’ दयानंद म्हेतर सर यांनी सादर केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन रघुनाथ बा. कांबळे सर यांच्या हस्ते झाले.
उत्सवाच्या पुढील दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०० वाजता रंगराव सु. कांबळे आणि अशोक रा. कांबळे यांच्या शुभहस्ते स्नेहभोजन आयोजित केले जाईल. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ४:०० वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, ज्यामध्ये डीजे साऊंड, लाईट शो आणि कोल्हापुरी हलगी हे विशेष आकर्षण असणार आहेत. या मिरवणुकीचे उद्घाटन माजी उपसरपंच सात्ताप्पा आ. कांबळे यांच्या हस्ते होईल.
१७ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०० वाजता महिलांसाठी ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा मनोरंजक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि बक्षिसे महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई कि. कांबळे आणि संघटक सीमा स. कांबळे यांच्या हस्ते प्रदान केली जातील. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०० वाजता लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा आणि रेकॉर्ड डान्स यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे आणि या कार्यक्रमातील सर्व बक्षिसे गौरव शा. कांबळे यांच्या हस्ते दिली जातील.
१९ एप्रिल रोजी सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात आंबिरा भजनी मंडळ, आंबिरा ग्रुप आणि समस्त बौद्ध समाज, पंचशीलनगर, गोकुळ शिरगाव हे संयुक्तपणे कार्यक्रम सादर करणार आहेत, अशी माहिती उत्सव समितीने दिली आहे.