इचलकरंजीत खंडणी प्रकरणी कुख्यात आनंदा जर्मनी पोलिसांच्या ताब्यात, तपासासाठी रोडवर फिरवले!

इचलकरंजी (सलीम शेख ): जर्मनी गँगच्या नावाने शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी या गँगचा म्होरक्या आनंदा शेखर जाधव ऊर्फ जर्मनी (वय २६, रा. जवाहरनगर) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी त्याला रोड परिसरात फिरवले, त्यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर रोडवरील हॉटेल व्यावसायिक उमेश म्हेत्रे यांना व त्यांच्या मुलाला मारहाण करून चाकूचा धाक दाखवत टेबलाच्या ड्राव्हरमधील सात हजार रुपयांची रोकड जर्मनी गँगच्या सदस्यांनी काढून घेतली होती. तसेच, “आम्ही आनंदा जर्मनी गँगचे आहोत, तू आम्हाला ओळखत नाहीस का?” असे म्हणत खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आनंदा जर्मनी, बजरंग फातले, अमर शिंगे, शुभम पट्टणकुडे, लोखंडे आणि अन्य दोघां अशा एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला होता.
खंडणी मागितल्याच्या घटनेनंतर आनंदा जर्मनी फरार झाला होता. त्याच्यावर यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एका अन्य प्रकरणात सातारा पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयाच्या परवानगीने सुमारे एक महिन्यापूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. बुधवारी पोलिसांनी आनंदा जर्मनीला तपासासाठी कोल्हापूर रोड परिसरात घटनास्थळी फिरवले. कुप्रसिद्ध असलेल्या या गुंडाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर्मनी गँगवर आतापर्यंत सात वेळा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.