कागल तालुक्यात रानटी प्राण्याचा हल्ला; १८ कोकरी ठार, मेंढपाळांचे मोठे नुकसान!

कागल (सलीम शेख) : तालुक्यातील लिंगनूर येथे शनिवारी पहाटे एका अज्ञात रानटी प्राण्याने केलेल्या हल्ल्यात १८ कोकरी ठार झाली, तर ६ कोकरी बेपत्ता झाली आहेत. या दुर्घटनेत स्थानिक मेंढपाळ श्री. सुखदेव आप्पासो शेळके (रा. कागल) यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
ही घटना लिंगनूर येथील शेतकरी सचिन आप्पासो शेटे यांच्या शेतात घडली. श्री. शेळके यांच्या मेंढ्या खतासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून या शेतात थांबल्या होत्या. शनिवारी पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान, तरसासारख्या रानटी प्राण्याने कळपावर हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच यशवंत ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संदीप हजारे यांनी तातडीने वनरक्षक ओंकार भोसले, श्री. जगदाळे व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी पाठवले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित पंचनामा करून आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.
यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष कोळेकर आणि जिल्हाध्यक्ष संदीप हजारे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पीडित मेंढपाळांचे सांत्वन केले आणि त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा मेंढपाळ सेना अध्यक्ष सिध्दू दिवटे, प्रसाद कदम, बाजीराव राणगे, संतोष शेळके, सुकुमार शेळके यांच्यासह अनेक शेतकरी आणि मेंढीपालन करणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली.
या घटनेमुळे मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण
निर्माण झाले असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यशवंत ब्रिगेडने वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
प्रा. डॉ. संतोष कोळेकर म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे मेंढपाळ बांधवांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे नैसर्गिक संकटे आणि दुसरीकडे आर्थिक नुकसान यामुळे मेंढपाळ बांधव अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.