हुपरी पंचक्रोशीतील पत्रकारितेचा आधारस्तंभ हरपला; अमजद भाई नदाफ यांचे दुःखद निधन

हुपरी (सलीम शेख ) : हुपरी पंचक्रोशीतील पत्रकारितेतील अत्यंत नावाजलेले व्यक्तिमत्व, दै. पुढारीचे जेष्ठ आणि निर्भीड वार्ताहर अमजद भाई नदाफ यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने हुपरी आणि परिसरातील पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अमजद भाई नदाफ यांनी दै. पुढारीचे वार्ताहर म्हणून अनेक वर्षे निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता केली. त्यांनी समाजातील ज्वलंत प्रश्न आणि समस्या नेहमी निर्भीडपणे मांडल्या. त्यांच्या लेखणीत समाजासाठी तळमळ होती. केवळ पत्रकारच नव्हे, तर त्यांनी हुपरी नगरसेवक म्हणूनही काम केले आणि आपल्या कामातून लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. ते एक मनमिळाऊ आणि सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
अमजद भाईंच्या निधनाने हुपरी पंचक्रोशीने एक निर्भीड पत्रकार आणि एक चांगला समाजसेवक गमावला आहे. त्यांचे कार्य नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि मोठा परिवार आहे.