कागल तालुक्यातील माद्याळ मध्ये एलसीबीची मोठी कारवाई; ऊस शेतीत गांजा पिकवणारा ताब्यात, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

कागल (सलीम शेख) : स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी कागल तालुक्यातील माद्याळ येथे मोठी कारवाई करत ऊस शेतीत गांजाची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. दिनकर कृष्णा राणे असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 2 लाख 20 हजार 570 रुपये किमतीचा 21 किलो 957 ग्रॅम ओला गांजा जप्त केला आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थांचा साठा आणि तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माद्याळ येथे एका शेतकऱ्याने ऊस शेतीत गांजाची शेती करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचला. या कारवाईत ऊस शेतीत गांजाची लागवड करणारा दिनकर कृष्णा राणे पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी कसून तपासणी करत त्याच्याकडून 21 किलो 957 ग्रॅम वजनाचा ओला गांजा जप्त केला, ज्याची किंमत 2 लाख 20 हजार 570 रुपये इतकी आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि अंमलदार अशोक पोवार, समीर कांबळे, राजू कांबळे, अरविंद पाटील, विजय इंगळे, रोहित मर्दाने, अनिकेत मोरे, युवराज पाटील, प्रशांत कांबळे, सतीश जंगम, हंबीर अतीग्रे, राम कोळी, रुपेश माने, सोमराज पाटील, विशाल खराडे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.