कागलजवळ लक्ष्मी टेकडी येथे ट्रक पलटी, अपूर्ण रस्त्यामुळे अपघात!

कागल (कोल्हापूर): पुणे-बेंगलोर महामार्गावरील कागलजवळील लक्ष्मी टेकडी येथे आज पहाटे चार वाजता भीषण अपघात झाला. पुण्याहून बेंगलोरकडे निघालेला कुरिअर वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे आणि ब्रेक निकामी झाल्यामुळे पलटी झाला. या अपघातात ट्रकचालक किशन गुप्ता (वय २८) सुदैवाने बचावले आहेत, मात्र ट्रकमधील कुरिअर सामानाचे मोठे नुकसान झाले.
पुणे-बेंगलोर महामार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अपूर्ण असल्याने या परिसरात वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. लक्ष्मी टेकडीसमोरील रस्ताही अपूर्ण असल्याने तेथून वाहने वारंवार घसरतात. आज पहाटे याच अपूर्ण रस्त्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ब्रेक निकामी झाल्याने ट्रक पलटी झाला.
या अपघातामुळे महामार्गावरील प्रवासी आणि परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेची कागल पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झालेली नाही.