गांधीनगरमध्ये फेरीवाल्याचा प्रामाणिकपणा; सापडलेले १ लाख रुपये परत केले, बक्षीस ही नाकारले!

गांधीनगर (सलीम शेख) : गांधीनगर येथील रस्त्याकडेला कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या बबन उदासी या फेरीवाल्याने एक लाख रुपये असलेली पैशांची बॅग परत करून प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण दिले आहे. करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
गांधीनगर रस्त्याकडेला बबन उदासी हे लहान मुलांचे कपडे विकून आपला उदरनिर्वाह चालवतात. काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील एक लग्नसोहळ्यातील लोक एक लाख रुपये असलेली बॅग त्यांच्या दुकानासमोर विसरले होते. बॅग हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली. बबन उदासी यांनी ती बॅग आपल्याजवळ सुरक्षित ठेवली होती. बॅग शोधत आलेल्या लोकांना ती परत केली.
बॅगेत एक लाख रुपये असल्याची खात्री केल्यानंतर त्या लोकांनी बबन उदासी यांचे आभार मानले आणि त्यांना बक्षीस म्हणून काही रक्कम देऊ केली. मात्र, बबन उदासी यांनी बक्षीस नाकारले आणि फक्त आशीर्वाद मागितले. या घटनेमुळे उपस्थितांना सुखद धक्का बसला.
या घटनेची माहिती मिळताच करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बबन उदासी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, दीपक पोपटाणी फ्रेम वाला, किशोर कामरा, दीपक धिंग, दीपक पोपटानी अंकल, वीरेंद्र भोपळे, सुनील पारपाणी, जितू चावला, अजित चव्हाण, प्रफुल्ल घोरपडे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते आणि व्यापारी उपस्थित होते.