नामदार चषक क्रिकेट स्पर्धा दिमाखात संपन्न; निल इंडिया स्पोर्ट्स हिंडलगा विजेता!

कागल: महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल येथे आयोजित केलेली डे-नाईट क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. या स्पर्धेत निल इंडिया स्पोर्ट्स हिंडलगा संघाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. त्यांना रोख १ लाख रुपये आणि आकर्षक विजयी चषक देऊन गौरविण्यात आले.
अमन आवटे युवा स्पोर्ट्स, कागल या संघाने उपविजेतेपद मिळवले. त्यांना ५१००० रुपये रोख व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त, डॅडी फॅन्स पाचगाव संघाने तिसरा क्रमांक पटकावला, तर रेड रॅकर्स करोली संघाने चौथा क्रमांक मिळवला. या दोन्ही संघांना अनुक्रमे २१००० रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तिक पुरस्कारांमध्ये सुशील भुरले याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून बॅट बक्षीस देण्यात आली, तर सागर कांबळे याने उत्कृष्ट गोलंदाज म्हणून स्मार्ट वॉच पटकावले. आकाश चव्हाण याला स्पर्धेतील मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले आणि त्याला ४३ इंचचा स्मार्ट टीव्ही बक्षीस म्हणून देण्यात आला.
बक्षीस वितरण समारंभास साजिद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश रावजी गाडेकर, माजी उप नगराध्यक्ष प्रवीण काळबर, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष संजय चितारी, युवानेते अर्जुन नाईक, गहिनीनाथ उद्योग समूहाचे चेअरमन सम्राट सनगर, युवानेते अमर सनगर, माजी उप नगराध्यक्ष विवेक लोटे, बच्चन कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे, ही स्पर्धा तब्बल १५ वर्षांनंतर दिवस-रात्र प्रकारात खेळवण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला होता.
अक्षय शेळके साहेब प्रेमी यांच्या वतीने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील सर्व सामन्यांना क्रिकेटप्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. भव्य स्क्रीन, लाईट टॉवर आणि बॅरिकेट्स यांसारख्या आधुनिक सुविधांमुळे स्पर्धेला एक विशेष रंगत आली होती. संयोजन समितीने घेतलेल्या अथक परिश्रमामुळे ही स्पर्धा प्रेक्षकांच्या मनात एक अविस्मरणीय छाप सोडण्यात यशस्वी ठरली.