कागलच्या जयसिंगराव पार्क मधील तलावात मृत मासे !

कागल (सलीम शेख) : कागल शहरातील जयसिंगराव पार्क मधील तलाव परिसरात मृत मासे मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी नियमित फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना हे दृश्य दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याचे व्हिडिओ बनवून कागल परिसरातील विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित करण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तलावाच्या काही विशिष्ट भागांमध्ये मोठ्या संख्येने मासे मृत अवस्थेत तरंगताना दिसत आहेत. या घटनेमुळे तलाव जवळ दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या माशांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता घटल्याने किंवा अन्य कोणत्याही अज्ञात कारणामुळे हे मासे मेले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
सध्या सोशल मीडियावर या मृत माशांच्या व्हिडिओंची चर्चा असून, नागरिक या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन माशांच्या मृत्यूचे कारण शोधावे आणि योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.