महाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगाव एमआयडीसीत सर्पमित्राला विषारी सापाचा चावा; वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर!

गोकुळ शिरगाव: गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील एका कंपनीत दि.10 एप्रिल रोजी नाग जातीचा विषारी साप आढळून आला. सर्पमित्र आणि जीवनरक्षक सुलतान शेख यांना याबाबत माहिती मिळताच, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सापाला पकडून बरणीत सुरक्षितपणे ठेवताना, अचानक सापाने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला.


या दुर्घटनेनंतर, कंपनीच्या शेजारी फरशीचे काम करणारे राजू बामणे यांनी तातडी दाखवत सुलतान शेख यांना आपल्या दुचाकीवरून सुमारे अर्ध्या तासात कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (सीपीआर) दाखल केले. रुग्णालयात रुग्णसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते बंटी सावंत यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि तत्काळ उपचारांना सुरुवात केली.


सर्पदंश झालेल्या सुलतान शेख यांना तातडीने अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तत्पर उपचारामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना जनरल वार्डमध्ये हलवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच, गोकुळ शिरगाव परिसरातील मित्रमंडळी आणि नागरिकांनी सीपीआर रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. सुलतान शेख यांच्या प्रकृतीसाठी ते प्रार्थना करत होते. वेळेत योग्य उपचार मिळाल्याने सुलतान शेख धोक्यातून बचावले आहेत, यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button