संघर्ष फाउंडेशन इंगळीची सामाजिक बांधिलकी; मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना मदत!

कोल्हापूर (सलीम शेख) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून संघर्ष फाउंडेशन इंगळी यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मातोश्री वृद्धाश्रम, कोल्हापूर येथे मदतीचा हात पुढे करण्यात आला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे साहित्य तसेच लेखक जगदीश मोहोळ यांचे प्रेरणादायी ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक भेट म्हणून दिले.
याप्रसंगी बोलताना संघर्ष फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले की, संस्थेचा उद्देश केवळ जयंती साजरी करणे नसून, समाजातील दुर्बळ घटकांना शक्य ती मदत करणे हा आहे. याच भूमिकेतून मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना थोडासा आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असलेले माजी उपसरपंच प्रशांतकुमार कांबळे यांनी संघर्ष फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच समाजातील उपेक्षित आणि वंचितांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांच्या जयंतीदिनी अशा प्रकारे गरजूंना मदत करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे.”
मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर यांनी संघर्ष फाउंडेशनचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “संघर्ष फाउंडेशनने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या मदतीने आमच्या आश्रमातील ज्येष्ठांना मोठा आधार मिळाला आहे.”
यावेळी संघर्ष फाउंडेशनचे प्रकाश कांबळे, सुभाष कांबळे, तानाजी शिंगे, शशांक कांबळे, ऋषिकेश कांबळे, अतुल कांबळे, उमेश गवंडी, हर्षल कांबळे, सागर कांबळे, सुशांत कांबळे, निशांत कांबळे, आदिनाथ कांबळे, प्रताप कांबळे, ओमकार कांबळे, प्रणव कांबळे, सम्राट कांबळे, प्रथमेश कांबळे आणि सूर्यप्रभा चिटणीस यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
संघर्ष फाउंडेशनने भविष्यातही सिध्दाई महिला मंडळ ट्रस्ट संचलित मातोश्री वृद्धाश्रमाला वेळोवेळी याच पद्धतीने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे या आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे