पट्टणकोडोलीत शिवीगाळीच्या वादातून एकावर तलवार हल्ला!

हुपरी (सलीम शेख) : हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे शिवीगाळीच्या कारणावरून झालेल्या वादात सौरभ राजू कांबळे याने जीवन दयानंद कांबळे यांच्यावर तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री घडली असून, यात जीवन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हुपरी पोलिसांनी सौरभ कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ कांबळे याचा आरोप आहे की जीवन कांबळे वारंवार शिवीगाळ करत होते. याच कारणावरून जाब विचारण्यासाठी सौरभने जीवन यांना मळीगेट येथे बोलावले. तिथे दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि संतप्त झालेल्या सौरभने जीवन यांना अश्लील शिव्या देत त्यांच्या डोक्यात, डाव्या हाताला, बरगडीला आणि वार रोखताना डाव्या हाताच्या बोटांना तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेची फिर्याद जखमी जीवन कांबळे यांच्या पत्नी राणी कांबळे यांनी हुपरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.