कोल्हापूर रस्ते घोटाळा: सीआयडी चौकशीची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची मागणी!

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर शहरातील १०० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. या घोटाळ्याची सीआयडी चौकशी करून कोल्हापुरातील ‘आका’ आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्याची मागणी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत कोल्हापूरच्या रस्ते विकासासाठी १०० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. १४ डिसेंबर २०२३ रोजी ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला होता आणि काम पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, १६ महिने उलटूनही केवळ ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मंजूर १६ रस्त्यांपैकी अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
शासनाने १०० कोटींपैकी केवळ २३ कोटी ४१ लाख रुपये महानगरपालिकेला दिले आहेत आणि तेवढीच रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाल्यास रस्त्यांची कामे आणखी काही महिने रखडण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने या प्रकल्पावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निविदा प्रक्रिया आणि ठेकेदाराची नियुक्ती पूर्वनियोजित घोटाळा असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. काही लोकप्रतिनिधी, तत्कालीन नगर अभियंता आणि मुख्य लेखापरीक्षक यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेने खालील मागण्या केल्या आहेत:
* महाराष्ट्र शासनाने कोल्हापूरकरांची फसवणूक केल्याबद्दल जाहीर माफी मागावी.
* स्वतःचे पद वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांची फसवणूक करणाऱ्या तत्कालीन नगर अभियंता आणि मुख्य लेखापरीक्षकांना निलंबित करावे.
* निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत.
* प्रशासकांनी १०० कोटी रुपयांच्या बेकायदेशीर निविदा प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा न्यायालयात दाद मागू.
* प्रशासकांनी यासंदर्भात चार दिवसात बैठक लावावी, अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
यावेळी संजय पवार ,विजय देवणे, हर्षल सुर्वे ,विशाल देवकुळे, मंजीत माने, दिनेश साळोखे ,राजू यादव ,महादेव कुकडे ,दीपक गौड, प्रतिज्ञा उत्तरे ,स्मिता सावंत, पुनम फडतरे, भरत आमते, दिपाली शिंदे ,कमल पाटील ,शुभांगी पवार, रिमा देशपांडे, माधवी लोणारी, विनोद खोत ,सुहास डोंगरे ,समीर पटेल, शशिकांत बिडकर ,दिलीप देसाई, हर्षल पाटील, सतीश पानारी, शौनक भिडे, शांताराम पाटील, संजय धुमाळ, राजेंद्र पाटील, विराज ओतारी, विवेक काटकर, रोहित वेडे ,प्रशांत पवार, सुमित मेळवंकी ,संजय जाधव, आदित्य कराडे दिलीप देसाई, डॉक्टर अनिल पाटील उपस्थित होते.