कोल्हापूर जिल्हा दिव्यांग क्रिकेट संघाची रत्नागिरीत द्वितीय क्रमांकाची नेत्रदीपक कामगिरी, उत्तम चौगुले यांचे मार्गदर्शन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : रत्नागिरी येथील दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठानने कोळंबे येथील सावंत स्पोर्ट मैदानावर आयोजित केलेल्या ‘कोकण चषक 2025’ या राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा दिव्यांग क्रिकेट संघाने उत्कृष्ट खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत रत्नागिरी, कोल्हापूर आणि बीड या तीन प्रमुख संघांनी सहभाग घेतला होता.
दिव्यांग सेना कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरच्या संघाने या स्पर्धेत आपली क्षमता दाखवून दिली. संघातील खेळाडूंनी सांघिक प्रयत्नांनी अंतिम फेरी गाठली आणि उपविजेतेपद पटकावले.
कोल्हापूर संघातील खालील खेळाडूंनी या स्पर्धेत प्रतिनिधित्व केले:
१. जगदीश शिंगाडे (कर्णधार)
२. उत्तम चौगुले (उपकर्णधार)
३. प्रभाकर पाटील
४. विकास अनुसे
५. भिकाजी कांबळे
६. शाहरुख तांबोळी
७. अविनाश चव्हाण
८. राजू सुतार
९. सुमित शिंदे
१०. सिध्देश पाटील
११. राहुल सुतार
गांधीनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद हुजूराणी यांनी कोल्हापूर संघातील सर्व खेळाडूंना क्रिकेट कीट प्रदान करून प्रोत्साहन दिले. अतुल धनवडे यांनी कोल्हापूर दिव्यांग क्रिकेट संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.
या यशाबद्दल बोलताना दिव्यांग सेना कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले म्हणाले की, “आमच्या संघाने रत्नागिरीत चांगली कामगिरी केली याचा आम्हाला अभिमान आहे. खेळाडूंनी दाखवलेले समर्पण आणि सांघिक भावना कौतुकास्पद आहे.” त्यांनी या विजयात सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानले.
कोल्हापूर जिल्हा दिव्यांग क्रिकेट संघाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे आणि संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.