भौतिक सुविधांपेक्षा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करावे – कर्नल शिवानंद वराडकर!

कोल्हापूर (सलीम शेख) : मराठी विज्ञान परिषद कोल्हापूर विभागातर्फे आयोजित निबंध स्पर्धा, गणिती उपकरणे व प्रकल्प स्पर्धा तसेच विज्ञान प्रयोग व प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात कर्नल शिवानंद वराडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीसाठी भौतिक सुविधांवर अवलंबून न राहता आपल्या मेहनतीवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
कर्नल वराडकर यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी कोणताही संकोच न बाळगता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. त्यांनी निरीक्षण करण्याची सवय लावावी, प्रत्येक गोष्टीची चौकशी करावी आणि योग्य माहिती मिळवून आपले विचार स्पष्टपणे मांडावेत. यासोबतच, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक आणि पाण्याचा जपून वापर करण्याचे तसेच वृक्षारोपण आणि वनसंवर्धनाचे महत्त्व त्यांनी सांगितले.
समुपदेशक राजेंद्र खैरमोडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे आणि स्वतःशी सकारात्मक संवाद साधावा. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा योग्य वापर करून पालकांनी विद्यार्थ्यांना प्रगती साधण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन आणि नोबेल पारितोषिक विजेते डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. डॉ. अंजली साळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर कार्यवाह अमर भोसले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानण्यात आले.