मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी खंडणी प्रकरणी अटक!

कोल्हापूर (सलीम शेख ) : मोक्का (Maharashtra Control of Organised Crime Act) गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना खंडणीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत. विशाल अविनाश माने उर्फ अजय अविनाश माने, अशी अटक करण्यात आलेल्या राजारामपुरी येथील आरोपींचे नाव आहेत. या गुन्ह्यात त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजारामपुरी परिसरात या तिघांची मोठी दहशत आहे. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात त्यांच्यावर यापूर्वी दरोड्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे आणि तेव्हापासून ते फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा कसून तपास करत होते. तपासादरम्यान, हे आरोपी पुणे जिल्ह्यातील चाकण येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने चाकण येथे सापळा रचून या तिघांनाही ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस अंमलदार वैभव पाटील, अरविंद पाटील, महेश कोरवी, प्रदीप पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, योगेश गोसावी आणि शिवानंद मठपती यांनी सक्रिय सहभाग घेतला. या सराईत गुन्हेगारांना पुन्हा अटक केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.