मुडशिंगीची कन्या प्राजक्ता माळी हिची डबल बाजी!

मुडशिंगी (सलीम शेख) : मुडशिंगी या लहानशा गावाने विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या माध्यमातून नेहमीच नावलौकिक मिळवला आहे. याच परंपरेत आता आणखी एका गुणी कन्येच्या डबल यशाची भर पडली आहे. कु. प्राजक्ता सिद्राम माळी या मुडशिंगीच्या सुकन्याने अत्यंत खडतर परिस्थितीतून जिद्द आणि चिकाटीच्या बळावर दोन महत्त्वाच्या सरकारी नोकऱ्या मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
प्राजक्ताने कोणतीही शिकवणी न लावता, स्वतःच्या मेहनतीने एम.पी.एस.सी. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तिची निवड मुंबई महानगरपालिकेत वर्ग २ अधिकारी म्हणून झाली आहे, यासोबतच वैद्यकीय शिक्षण विभागात तिने वर्ग ३ लिपिक-टंकलेखक पदालाही गवसणी घातली आहे. एकाच वेळी दोन प्रतिष्ठित पदांवर निवड होण्याची ही दुर्मिळ कामगिरी प्राजक्ताने करून दाखवली आहे.
या तिच्या डबल यशाबद्दल मुडशिंगी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत प्राजक्ताचा गौरव केला आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी करवीरचे माजी सभापती प्रदिप झांबरे, माजी सरपंच आप्पासाहेब धनवडे, माजी उपसरपंच चंद्रकांत नेर्ले, गोकुळ संस्थेचे माजी अध्यक्ष राजू ठमके, निवृत्त अधिकारी भारत माळी, जंगम, प्राजक्ताचे वडील सिद्राम माळी, रतन कांबळे, सिध्दार्थ कांबळे आणि मिलिंद माळी यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी प्राजक्ताच्या अथक परिश्रमांचे कौतुक केले आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्राजक्ताचे हे यश केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण मुडशिंगी गावाला प्रेरणा देणारे आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.