रेंदाळ येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उपोषण स्थगित; सरपंचांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची माघार!

हातकणंगले (सलीम शेख) : हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ ग्रामपंचायतीसमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे. पाच टक्के थकित निधी मिळावा, या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले होते.
ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया पाटील यांनी आंदोलकांना सकारात्मक प्रतिसाद दिला. थकीत निधीतून घरफाळा जमा करून उर्वरित रक्कम दहा दिवसांच्या आत देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव खानविलकर यांच्या मध्यस्थीनंतर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आपले उपोषण मागे घेतले.
दरम्यान, उपोषणाला बसण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी आंदोलकांशी चर्चा न केल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली. “उपोषण सुरू झाल्यावरच चर्चा का केली जाते?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात होता.
यावेळी उपसरपंच अभिषेक पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक पुजारी, पोलीस पाटील सचिन पुजारी, प्रहार संघटनेचे सुनील पाटील, प्रभारी ग्रामविकास अधिकारी आप्पासाहेब वीरकर, महेश माळी, अध्यक्ष जमीर माणकापुरे, संभाजी शेलार, निलेश कुंभार यांच्यासह प्रहार संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.