राजाराम महाविद्यालयातील कथित आंधळा कारभाराविरोधात युवासेनेचा आक्रमक पवित्रा; भ्रष्टाचाऱ्यांविरोधात उग्र आंदोलनाचा इशारा!

कोल्हापूर (सलीम शेख ): शासकीय राजाराम महाविद्यालयात सुरू असलेल्या कथित अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात कोल्हापूर युवासेनेने (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक भूमिका घेतली आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आज महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देत तातडीने गैरकारभार थांबवण्याची मागणी केली. अन्यथा, उग्र आंदोलन करून भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे.
शंभर वर्षांहून अधिक जुनी आणि अनेक विद्वान व्यक्तींना घडवलेल्या राजाराम महाविद्यालयाचा दर्जा गेल्या दोन-तीन वर्षांपासून खालावत चालला असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. निवेदनात युवासेनेने अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत, ज्यात प्रामुख्याने तासिका तत्वावरील शिक्षकांना पूर्ण महिनाभर काम करूनही केवळ २३ दिवसांचे वेतन देणे आणि मागील तीन महिन्यांपासून पगार थकवणे, कायमस्वरूपी प्राध्यापकांचे अनियमित तास आणि सीएसबी शिक्षकांकडून कामे करून घेणे, प्राध्यापकांची महाविद्यालयात येऊन बायोमेट्रिक हजेरी लावून लगेच बाहेरगावी जाणे आणि सायंकाळी परत येऊन हजेरी लावणे, प्राध्यापिका अर्चना पाटील यांच्या हंगामी नियुक्तीमधील कथित अनियमितता आणि नियमबाह्य कायमस्वरूपीकरण, अनेक प्राध्यापकांच्या वर्षांनुवर्षे न झालेल्या बदल्या आणि त्यामध्ये असलेले कथित अर्थकारण, होम सायन्स विभागात विषयज्ञान नसलेल्या प्राध्यापकांकडून अध्यापन आणि विद्यार्थ्यांकडून गैरमार्गांचा अवलंब करण्यास सांगणे, महाविद्यालयातील वर्गखोल्यांची दुरवस्था, स्वच्छतागृहांची वाईट स्थिती आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय, प्रामाणिक प्राध्यापकांना त्रास देणे आणि एका तोतया व्यक्तीद्वारे मानसिक दबाव आणणे यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.
युवासेनेने या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती बोडके यांना निवेदन देण्यासाठी गेले असता, प्राचार्यांनी त्यांना आत येण्यास मनाई केल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पदाधिकाऱ्यांना आत प्रवेश मिळाला.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित किरण माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, महानगर प्रमुख सनराज शिंदे, शहर प्रमुख सुमित मेळवंकी, समन्वयक रोहित वेढे, किर्ती जाधव, सचिन नांगटिळक, ओंकार मंडलिक, शुभम पाटील, अक्षय घाटगे, अभि दाबाडे, युवराज मोरे, प्रथमेश देशिंगे, सिद्धेश नाईक, आदित्य हुलजी, विशाल दाबाडे, मारुती कारंडे, आकाश शिंदे, विशाल दाबाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. युवासेनेच्या या भूमिकेमुळे राजाराम महाविद्यालयातील कथित गैरकारभारावर आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे