कट्टर शिवसैनिक बाळासाहेब निगवेकर यांचे शिवजयंती दिनी निधन, कोल्हापुरात शोक!

कोल्हापूर, दि. २९ (सलीम शेख) : कट्टर शिवसैनिक आणि निस्सीम शिवभक्त म्हणून ओळखले जाणारे मारुती उर्फ बाळासाहेब निगवेकर (वय ७१, रा. धोतरी गॅल्ली, गंगावेश) यांचे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बाळासाहेब निगवेकर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत होते. त्यांनी शिवरायांची मूर्ती असलेली गाडी सजवून, तिला स्पीकर लावून शिवाजी महाराजांची प्रेरणादायी गाणी लावली होती. याच गाडीसह ते कोल्हापूर शहरातून फेरफटका मारत होते. मिरवणुकीदरम्यान अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले.
ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एका निष्ठावान शिवभक्ताचे शिवजयंतीच्या पवित्र दिवशी झालेले निधन पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बाळासाहेब निगवेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय होते आणि त्यांची शिवाजी महाराजांवर नितांत श्रद्धा होती. ते परिसरातील प्रत्येक शिवजयंती कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असत. त्यांचे अचानक झालेले निधन हे केवळ त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण शिवसैनिकांसाठी आणि शिवभक्तांसाठी एक मोठी दुःखद घटना आहे. त्यांच्या आठवणी कायम राहतील, अशा भावना अनेक शिवप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.