कोल्हापूरच्या दिव्यांग सेनेची रत्नागिरी येथे क्रिकेट स्पर्धेसाठी निवड!

कोल्हापूर ( सलीम शेख ): दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोल्हापूरच्या दिव्यांग सेनेची निवड झाली आहे. ही स्पर्धा २६ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत रत्नागिरी येथे होणार आहे.
दिव्यांग सेना सामाजिक संघटनेने या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष प्रशांत महेंद्र सावंत यांनी पत्र पाठवून त्यांच्या सहभागाची निश्चिती कळवली आहे, अशी माहिती दिव्यांग युवा सेना जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले यांनी दिली.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या दिव्यांग बांधवांना खेळाचे साहित्य, प्रवास खर्च आणि इतर आवश्यक गरजांसाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे करवीर तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायती आणि दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन उत्तम चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
‘एक हात मदतीचा दिव्यांग बांधवांच्या यशासाठी’ या भूमिकेतून समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या खेळाडूंना सहकार्य करणे अपेक्षित आहे.