तामगाव हद्दीतील घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट कार्यालयात तोडफोड, बिहारी कामगारांना मारहाण; कामावरून काढल्याचा राग!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : तामगाव येथील अभिषेक स्पिनिंग मिलच्या परिसरातील गोडावूनमध्ये असलेल्या घाटगे-पाटील ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका धक्कादायक घटनेत तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला. कामावरून काढल्याच्या रागातून काही व्यक्तींनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली, तसेच तीन बिहारी कामगारांना बेदम मारहाण केली.
या मारहाणीत मिथलेश शिवानंद मंडल आणि अक्षय विलास भोईटे हे जखमी झाले असून, कंतलाल प्रमोद मंडल हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी फिर्यादी कंतलाल प्रमोद मंडल यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय भाऊसाहेब भंडारी (वय २२, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर), गणेश अनिल कोळी (वय २५, रा. विक्रमनगर) आणि ऋषीकेश संजय जाधव (वय २२, रा. टेंबलाईवाडी) या तीन संशयित आरोपींना गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हे घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट कार्यालयात हमालीचे काम करत होते. मात्र, कामचुकारपणा करत असल्याने त्यांना सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी बिहारी कामगारांना त्यांच्या घरात जाऊन मारहाण केली होती, त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांचे हमालीचे पैसे देऊन त्यांना पुन्हा कामावर येऊ नये असे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी माफीही मागितली होती.
परंतु, रविवारी रात्री हेच आरोपी दारूच्या नशेत कार्यालयात घुसले आणि त्यांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. तसेच, कार्यालयात असलेल्या बिहारी कामगारांना जबर मारहाण केली. या घटनेमुळे घाबरून दोन कामगार त्यांच्या गावी परत गेले आहेत, तर गंभीर जखमी कंतलाल मंडल यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोकुळ शिरगाव पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.