उचगाव हायवे पुलाखाली गटारीमुळे वाहतूक कोंडी, पाईपलाईनला धोका; शिवसेनेची मागणी!

उचगाव (सलीम शेख) : उचगाव हायवे पुलाखाली तुंबलेल्या गटारींमुळे वाहतूक कोंडी होत असून, गांधीनगर नळ पाणी योजनेच्या पाईपलाईनला हायवेच्या कामामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.
उचगाव पुलाखालून हुपरी-पट्टणकोडोली, गडमुडशिंगी, मणेरमळा आणि कर्नाटकात जाणारी मोठी वाहतूक असते. सरनोबतवाडी येथील पूल पाडल्याने या पुलाखालून वाहतूक वाढली आहे. पुलाखालील गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर येत असून, दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे दिवसातून अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. उन्हाळ्यात वाहतूक कोंडी सोडवताना पोलीस आणि फेरीवाल्यांना त्रास सहन करावा लागतो.
शिवसेनेने पुलाखालील गटारी भूमिगत करण्याची आणि वळणावरच्या परसट गटारीमुळे होणारी कोंडी टाळण्याची मागणी केली आहे. तसेच, कणेरीवाडी, गो. शिरगाव, सरनोबतवाडी येथे सुरू असलेल्या हायवेच्या कामामुळे गांधीनगर नळ पाणी योजनेच्या पाईपलाईनला धोका निर्माण होऊ नये, यासाठी ठेकेदारांना सूचना देण्याची मागणी केली आहे. या योजनेवर १४ गावे अवलंबून असून, पाईपलाईनला धक्का लागल्यास नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू शकते, असे निवेदनात म्हटले आहे.
या मागणीचे निवेदन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, उजळाईवाडी येथील प्राधिकरण अभियंता महेश विष्णू पाटोळे यांना देण्यात आले. अधिकाऱ्यांनी गटारींचे योग्य नियोजन करण्याचे आणि पाईपलाईनला धोका पोहोचू नये याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपतालुकाप्रमुख राहुल गिरूले, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष दत्ता फराकटे, शरद माळी, कैलास जाधव, सचिन नागटिळक, बाळासाहेब नलवडे, मोहन रजपूत, किशोर कामरा, सुनील पारपाणी, दीपक फ्रेमवाला, बाबुराव पाटील, प्रफुल्ल घोरपडे, संदीप शेटके, तौफिक पठाण आदी उपस्थित होते.