उंचगावात ‘बँक आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी; १०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी पेन्शन वाटप!

उंचगाव (सलीम शेख ) : करवीर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माध्यमातून ‘बँक आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाद्वारे उंचगाव येथील शासकीय योजनेतील तब्बल १०० लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच पेन्शनचे वाटप करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांसारख्या शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., शाखा मार्केट यार्ड येथे पेन्शन घेण्यासाठी जावे लागते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक असलेल्या या पेन्शनधारकांना सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात मार्केट यार्डला जाणे गैरसोयीचे आणि त्रासदायक ठरत होते.
या अडचणीची दखल घेत, करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या प्रयत्नातून ‘बँक आपल्या दारी’ हा उपक्रम साकारण्यात आला. बँकेच्या सहकार्याने उंचगावातील पेन्शनधारकांसाठी उंचगाव येथील मंगेश्वर मंदिरात एका विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये आज १०० लाभार्थ्यांना त्यांच्या पेन्शनची रक्कम सुलभपणे वितरित करण्यात आली.
या उपक्रमाच्या वेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, अजित चव्हाण, केरबा माने यांच्यासह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी सुनिल केसरकर, मिलींद प्रभावळकर, विजया माने आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शिवसेनेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.