महाराष्ट्र ग्रामीण

उजळाईवाडी पूर्व भागाला मिळाली अर्बन ११ के.व्ही. लाईन; सरपंच उत्तम आंबवडेंच्या प्रयत्नांना यश!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : उजळाईवाडी गावाच्या पूर्व भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. या भागाला आता अखंड वीजपुरवठा मिळणार असून, लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे उजळाईवाडीत अर्बन ११ के.व्ही. लाईन कार्यान्वित झाली आहे. ही नवी वीज लाईन सरनोबतवाडी येथून जोडण्यात आली असून, ती थेट गोकुळ शिरगाव विद्युत उपकेंद्राशी संलग्न आहे. विशेष म्हणजे, या लाईनद्वारे २१ एप्रिलपासून वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

उजळाईवाडीमध्ये नागरीकरण वेगाने वाढत असल्यामुळे घरगुती विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. पूर्वी गोकुळ शिरगाव येथून होणाऱ्या लांबच्या वीजपुरवठ्यामुळे वारंवार वीज खंडित होत असे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांमध्ये, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि गृहिणींच्या कामकाजात मोठी अडचण येत होती.
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरपंच उत्तम आंबवडे यांनी तातडीने पाऊले उचलली. त्यांनी गोकुळ शिरगाव विद्युत विभागाचे अभियंता हर्षल कांबळे यांच्याशी पत्रव्यवहार करून उजळाईवाडीसाठी स्वतंत्र वीजपुरवठा योजनेची मागणी केली. त्यांच्या या मागणीची दखल घेत विद्युत विभागाने त्वरित सर्वेक्षण करून नव्या लाईनचे काम सुरू केले. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, सरनोबतवाडी येथून जोडलेल्या नवीन अर्बन ११ के.व्ही. लाईनमुळे परिसरातील हिंदकेसरी दादू चौगुले नगर, शाहू नाका परिसर, तुळजा भवानी नगर, हनुमान नगर, वैभव सोसायटी, पद्माराजे हौसिंग सोसायटी, कंजारभाट वसाहत आणि लघुवेतन सोसायटी या भागातील नागरिकांना आता अखंड आणि स्थिर वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे.
या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल ग्रामपंचायत उजळाईवाडीच्या वतीने विद्युत विभागाचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात सरपंच उत्तम आंबवडे, उपसरपंच भाग्यश्री पारखे, प्रभारी उपकार्यकारी अभियंता कागल सबडिव्हिजन रविंद्र सदानंद, कनिष्ठ अभियंता महेश पाटील, कनिष्ठ सहायक अभियंता मृणाल वाकणकर, कुलदीप गायकवाड, लाईनमन संजय कोळी, सुनील शिवशरण, सुनील जाधव, पंडित कांबळे आणि ग्रामपंचायत सदस्य विलास कुंभार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच उत्तम आंबवडे यांच्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासूनची नागरिकांची गैरसोय दूर झाली असून, परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button