मुरगुडच्या शिवराज विद्यालयाची यशाची हॅटट्रिक! बिरदेव डोणे आयपीएस परीक्षेत उत्तीर्ण!

मुरगुड (सलीम शेख) : येथील शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात आपला दबदबा कायम राखला आहे. विद्यालयाचा विद्यार्थी कु. बिरदेव सिद्धाप्पा डोणे (मूळ गाव यमगे) याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) परीक्षेत ५५१ व्या क्रमांकाने यश मिळवले आहे. या अतुलनीय यशाने शिवराज विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यालयाने यशाची हॅटट्रिक साधली आहे.
यापूर्वी याच विद्यालयाचे विद्यार्थी राजेंद्र जालीमसर (शिंदेवाडी) यांनी आयएएस (भारतीय प्रशासन सेवा) आणि शितल कर्णे (सोळांकूर) यांनी आयएसएस (भारतीय सांख्यिकी सेवा) परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे. याच परंपरेला पुढे नेत बिरदेव डोणे याने आपल्या जिद्दी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
अत्यंत गरीब कुटुंबातील आणि यमगे गावातील बिरदेव लहानपणापासूनच हुशार होता. त्याने ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेत शिकत असताना ८९ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता, तसेच ग्रामीण जिल्ह्यामध्येही त्याने अव्वल स्थान मिळवले होते. आता आयपीएस परीक्षेत मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाने त्याने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण धनगर समाजाचे नाव उंचावले आहे. आपल्या आई-वडिलांचे कष्ट आणि त्याग यांचे सार्थक करत बिरदेवने यमगे गावाला देशपातळीवर ओळख मिळवून दिली आहे.
शिवराज विद्यालयाच्या या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य आणि शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. बिरदेवच्या या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.