कागलमध्ये कावळ्यांची दहशत: गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर परिसरात नागरिक भयभीत
कागलमध्ये कावळ्यांची दहशत: गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर परिसरात नागरिक भयभीत

कागल (सलीम शेख ) : कागल शहरातील गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर शाळेच्या आवारात सध्या कावळ्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. शाळेच्या परिसरातील एका झाडावरील घरट्यातून कावळ्याचे पिल्लू बाहेर पडल्याने संतप्त झालेल्या कावळ्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर अक्षरशः हल्ला चढवला आहे. यामुळे या भागातून पायी जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक हल्ला पासून वाचवण्यासाठी पळ काढत असल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिराच्या आवारात अनेक मोठी झाडे आहेत आणि या झाडांवर कावळ्यांची अनेक घरटी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून यातील एका घरट्यातून कावळ्याचे एक पिल्लू बाहेर पडले आणि ते झाडाखाली आले. परिसरातील काही लोकांनी या पिल्लाला रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न कावळ्यांना मान्य नव्हता. पिल्लाला हात लावण्याचा प्रयत्न होताच, झाडावरील कावळ्यांनी संतप्त होऊन जोरदार ओरडण्यास सुरुवात केली आणि थेट लोकांवर हल्ला चढवला.
या घटनेनंतरही कावळ्यांचा राग शांत झाला नाही. पिल्लू झाडाखाली असल्याने, पिल्लाच्या संरक्षणासाठी झाडावरील कावळ्यांनी परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर हल्ला करणे सुरू केले आहे. अचानक डोक्यावर, खांद्यावर चोच मारून कावळे लोकांना जखमी करत आहेत. यामुळे या रस्त्याने जाण्यास नागरिक कचरू लागले आहेत. अनेक लोक रस्त्यावरून अक्षरशः पळ काढत आहेत, तर काहीजण लांबचा वळसा घालून जात आहेत.
या अनपेक्षित हल्ल्यांमुळे गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर परिसरातील नागरिकांमध्ये कावळ्यांची दहशत निर्माण झाली आहे. कावळ्याच्या पिल्लाला सुरक्षित स्थळी हलवून किंवा कावळ्यांच्या या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवून नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.