महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापुरात केंद्रीय विद्यालय आणि विमानतळ विस्तारीकरणाला गती: खासदार धनंजय महाडिक यांची माहिती!

कोल्हापूर (सलीम शेख ) : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात वर्षभरात केंद्रीय विद्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. तसेच, भविष्यातील हवाई सेवेचा वाढता विस्तार लक्षात घेता उजळाईवाडी विमानतळाची धावपट्टी 3 हजार मीटरपर्यंत वाढवण्यात येणार असून, एरो ब्रिजची सुविधाही उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीनंतर खासदार महाडिक पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापुरात केंद्रीय विद्यालय व्हावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता. शासनाने त्याला मान्यता दिली असून, प्रशासनाने दोन जागा सुचवल्या आहेत. केंद्रीय समितीच्या पाहणीनंतर आणि मान्यतेनंतर या कामाला सुरुवात होईल, असे महाडिक यांनी सांगितले.


उजळाईवाडी विमानतळावरून 15 मे पासून हवाई सेवेचा विस्तार होत आहे. लवकरच हैदराबाद आणि बेंगलोर या दोन नवीन मार्गावर विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे भविष्यातील हवाई सेवेची वाढती व्याप्ती लक्षात घेता विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. सध्या विमानतळाची धावपट्टी 2 हजार 300 मीटरवरून 3 हजार मीटरपर्यंत वाढवण्यात येईल. तसेच, टर्मिनल बिल्डिंगमध्ये एरो ब्रिजची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे महाडिक यांनी स्पष्ट केले.


कोल्हापुरी चपलेला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी क्लस्टर योजनाही अंमलात येत आहे. केंद्र सरकारने चर्मोद्योगाच्या वाढीसाठी 100 कोटी रुपयांची मेगा क्लस्टर योजना जाहीर केली आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरी चप्पलच्या क्लस्टर योजनेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे महाडिक यांनी सांगितले.
जिल्ह्यातील दुर्गम डोंगरी तालुक्यातून वन विभागाच्या हद्दीतून 6 रस्ते गेले आहेत. हे रस्ते नागरिकांच्या वापरात येण्यासाठी पीडब्ल्यूडी, वन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे महाडिक यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button