कुमार भवन पुष्पनगरच्या आंचल देसाईची उतुंग तेज फाउंडेशन मार्फत अभ्यास दौऱ्या साठी निवड!

भुदरगड : (पत्रकार- सुभाष भोसले): भुदरगड तालुक्यातील कुमार भवन, पुष्पनगर या माध्यमिक प्रशालेची विद्यार्थीनी कुमारी आंचल संतोष देसाई हिची उत्तुंग तेज फाउंडेशन यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या बालवैज्ञानिक स्पर्धेतून ISRO , IIT व सायन्स नॉलेज सिटी अहमदाबाद या अभ्यास दौऱ्यासाठी अभिनंदनीय निवड जाहीर करण्यात आली. उत्तुंगतेज फाउंडेशन मार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा निकाल www.uysc.in या संकेतस्थळावर जाहीर झाला.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यांनी भविष्यात शास्त्रज्ञ बनण्याची स्वप्न बघावी या उद्देशाने उत्तुंगतेज फाउंडेशनचे संस्थापक रामेश्वर हालगे यांनी राज्यभर विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मला शास्त्रज्ञ व्हायचं ही चळवळ सुरू केली आहे. राज्यातून 48 केंद्रावर झालेल्या परीक्षेतून चार हजार विद्यार्थ्यातून ७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यामध्ये तिचा समावेश आहे. कुमारी आंचल देसाई हिने लेखी व मुलाखतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवत हे सुयश संपन्न केले. या यशाने कुमार भवन पुष्पनगर प्रशालेच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. या विद्यार्थिनीला संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.निशिकांत चव्हाण यांची प्रेरणा लाभली. विज्ञान शिक्षक श्री. एस एम तांबेकर , लिपिक श्री. दीपक देसाई तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.