कोल्हापूरकरांचा भारतीय जवानांना सलाम: ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅली!

कोल्हापूर (सलीम शेख ) : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले. ‘आम्ही कोल्हापूरकर…. भारतीय सैन्यासोबत…’ या भावनेतून कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने दसरा चौक येथून या रॅलीला प्रारंभ झाला, तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिची सांगता झाली.
या महत्त्वपूर्ण उपक्रमात कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. या तिन्ही मान्यवरांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय, कोल्हापूर शहरातील नागरिक आणि माजी सैनिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय जवानांप्रति आपली निष्ठा आणि पाठिंबा दर्शविला.
दसरा चौकातून निघालेली ही तिरंगा रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरली. हातात तिरंगा ध्वज घेतलेले नागरिक ‘भारत माता की जय’ आणि ‘भारतीय जवान अमर रहे’ अशा घोषणा देत होते. या रॅलीमुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता झाली. या ठिकाणी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, “कोल्हापूर नेहमीच देश आणि सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात आपल्या जवानांना पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापूरकरांनी जे एकजूट दाखवली आहे, ती निश्चितच प्रेरणादायी आहे.”
आमदार अमल महाडिक यांनी आपल्या भाषणात म्हटले, “भारतीय सैन्याचे शौर्य आणि बलिदान अमूल्य आहे. कोल्हापूरमधील नागरिकांचा हा सहभाग जवानांना अधिक धैर्याने आपले कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहित करेल.”
प्रदेश सचिव महेश जाधव यांनी कोल्हापूरकरांच्या देशभक्तीच्या भावनेचे कौतुक केले आणि सांगितले की, “या रॅलीच्या माध्यमातून कोल्हापूरने देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचे सिद्ध केले आहे.”
या तिरंगा रॅलीने कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात भारतीय सैन्याबद्दल असलेला आदर आणि अभिमान पुन्हा एकदा अधोरेखित केला.