शिक्षकांची स्वारी.!विद्यार्थ्यांच्या दारी..! प्रवेशासाठी चढाओढ, विद्यार्थी व पालकांशी संवाद!

धुंदवडे ( विलास पाटील ) : सध्या शिक्षण क्षेत्रात खाजगी शिक्षण संस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थी मिळवण्यासाठी संस्था स्तरावर स्पर्धा वाढली आहे.विद्यार्थ्यांचा आपल्या महाविद्यालयात प्रवेश व्हावा यासाठी प्राध्यापक थेट पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
नुकतेच दहावी ,बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल लागले आहेत. पारंपरिक शिक्षणापेक्षा नोकरी देणाऱ्या शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. पालक आपल्या पाल्याच्या करिअर बाबत जागृत झाले आहेत. सरकारी शाळांना संच मान्यता व शिक्षण समायोजन रोखण्यासाठी पटसंख्या वाढीचे आव्हान आहे. त्यामुळे शिक्षक व प्राध्यापकांची प्रवेश क्षमता पूर्णत्वासाठी विद्यार्थी पालकांबरोबर संपर्क साधला जात आहे.
खाजगी शिक्षण संस्थांचे पेव फुटल्यामुळे सरकारी शाळांना पट वाढवण्यासाठी व तो टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत .यामुळे प्राथमिक स्तरापासून ते महाविद्यालयांपर्यंतच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागत आहेत .विद्यार्थी व पालकांपर्यंत प्रत्यक्ष भेटून त्यांचे समुपदेशन करावे लागत आहे .पालकांशी प्रत्यक्ष व दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आपल्या शाळेत प्रवेश घेण्याबाबत विनंती ही केली जात आहे.
प्राध्यापक वर्गांना नोकरी टिकवण्यासाठी प्रवेश क्षमता पूर्ण होणे आवश्यक असून त्यासाठी प्राध्यापकांची स्वारी विद्यार्थ्यांच्या दारी पोहोचत आहे. विद्यार्थ्यांचा आपल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी विविध शैक्षणिक व भौतिक सुविधा, शिष्यवृत्ती व शासकीय योजनांचा लाभ यांचे आमिष विद्यार्थी व पालकांना दाखवण्यात येत आहे.