एमआयडीसीमध्ये ५ जून रोजी स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान; उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : येत्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरात स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या अभियानाच्या नियोजनासाठी नुकतीच एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, उप अभियंता अजय कुमार रानगे, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फिल्ड ऑफिसर आर. आर. माटकर, असिस्टंट इंजिनिअर गंगाराम पाथरवट, रोहन पाटील व प्रदीप कांबळे आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कोल्हापूर फाउंड्री क्लस्टरचे चेअरमन व सीमा संचालक दीपक चोरगे, गोशिमाचे मानद सचिव संजय देशिंगे, खजिनदार अमोल यादव, सल्लागार संचालक मोहन पंडितराव, मॅकचे संचालक हरिश्चंद्र धोत्रे, गोशिमा संचालक अनिरुद्ध पगारे, रणजीत पाटील, सचिव कृष्णा सावंत यांच्यासह एमआयडीसीमधील अनेक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक आणि उप अभियंता अजय कुमार रानगे यांनी याप्रसंगी सर्व उद्योजकांना आवाहन केले की, ५ जून रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत संपूर्ण एमआयडीसी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. “सर्व उद्योजकांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या परिसराची स्वच्छता करावी आणि प्रत्येकाने किमान एक झाड लावून प्रशासन व पर्यावरणासाठी सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले. तिन्ही एमआयडीसीमध्ये एकाच वेळी हे अभियान राबवले जाणार आहे.
यावेळी प्लास्टिकबंदी आणि प्लास्टिक पुनर्वापराचे नियोजन कसे करावे, यावरही चर्चा करण्यात आली. आय. ए. नाईक यांनी एमआयडीसी परिसरात जास्तीत जास्त झाडे लावून महाराष्ट्रातील “ग्रीन एमआयडीसी” घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. या अभियानाला उद्योजकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.