बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या!

कोनोली तर्फ असंडोली तालूका राधानगरी (सलीम शेख ): बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून कोनोली तर्फ असंडोली पैकी कुपलेवाडी येथील १८ वर्षीय विद्यार्थिनी साधना पांडुरंग टिंगे हिने आत्महत्या केली. गुरुवारी (दि. ९ मे) दुपारी एकच्या सुमारास तिने राहत्या घरी गळफास घेतला.
साधना ही कोनोली तर्फ असंडोलीच्या सरपंच वृषाली पांडुरंग टिंगे यांची मुलगी होती. ती पनोरे (ता. पन्हाळा) येथील एका महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तिला ४८ टक्के गुण मिळाले होते. हे गुण तिच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने ती काही दिवसांपासून निराश होती.
गुरुवारी दुपारी घरात कोणी नसल्याचे पाहून साधनाने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. रात्री उशिरा या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तिच्या कुटुंबातील जवळचे तीन सदस्य पोलीस दलात कार्यरत आहेत. असे असूनही साधनाने आपल्या मनातली खंत कोणाजवळही व्यक्त न करता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.