महाराष्ट्र ग्रामीण

जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे दिमाखदार लोकार्पण!

जयसिंगपूर (सलीम शेख ) : जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आणि आकर्षक आश्वारूढ पुतळ्याचा आणि संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जयसिंगपूर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना आदराने अभिवादन केले.


उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदना दिली आणि या सुंदर पुतळ्याच्या उभारणीसाठी जयसिंगपूर नगरपरिषदेचे अभिनंदन केले. शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा अश्वारूढ पुतळा जयसिंगपूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार करणारा आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.


या सोहळ्याला कोल्हापूरचे लोकप्रिय खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आरोग्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोकराव माने, आमदार किसन वानखेडे, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र माने, संजय पाटील यड्रावकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अनेक प्रमुख अधिकारी, कर्मचारी तसेच हजारो शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या शिकवणुकीवर प्रकाश टाकला. जयसिंगपूर शहरात उभारलेला हा आश्वारूढ पुतळा युवकांना प्रेरणा देईल आणि त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.


एकंदरीत, जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या पुतळ्यामुळे जयसिंगपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button