कागल पोलिसांकडून महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला २४ तासांत अटक

कागल (सलीम शेख ): एका महिलेचा हात पकडून तिच्याशी अश्लील वर्तन करून पळून गेलेल्या आरोपीला कागल पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रतीक उर्फ भोला तानाजी कांबळे (वय २२, राहणार शाहूनगर बेघर वसाहत, कागल) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला शाहूनगर बेघर वसाहत येथील आपल्या घराच्या दारात भांडी घासत होती. त्याचवेळी आरोपी प्रतीक कांबळे मोटारसायकलवरून तिथे आला. त्याने गाडीचा हॉर्न मोठ्याने वाजवून तसेच गाडी रेस करून महिलेचे लक्ष वेधले. त्यानंतर त्याने महिलेला ‘तू माझ्यासोबत चल’ असे म्हणून तिचा हात पकडला आणि वाईट हावभाव केले. महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तो तेथून पळून गेला आणि बेपत्ता झाला.
या घटनेची तक्रार ६ मे रोजी दुपारी पावणेचार वाजता कागल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला. गुप्त माहिती मिळताच, कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे, पोलीस अंमलदार प्रभाकर पुजारी, शंकर काशीद, जस्मिन शेख, तेजस्विनी पाटील, राधिका कारेकर आणि सुनिता जोडगुद्री यांच्या पथकाने आरोपीला अटक करण्याची मोहीम यशस्वी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नागेश खैरमोडे करत आहेत.