वडडवाडी कुरणे वसाहतमध्ये गटाराच्या समस्येने नागरिक हैराण; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी!

कागल, [सलीम शेख]: कागल शहरातील वडडवाडी कुरणे वसाहतमध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे गटारांची दुरवस्था आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. लहान गटारे आणि वेळेवर सफाई न झाल्याने गटारातील घाण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि लोकांच्या घरात शिरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अवकाळी पावसामुळे गटारे तुंबून गटारातील पाणी आणि कचरा अक्षरशः घरांमध्ये घुसला. यामुळे संपूर्ण वसाहतीत दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डास आणि इतर किटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही गटारांची रुंदी वाढवण्यात आली नाही आणि त्यांची नियमित सफाई केली जात नाही, अशी तक्रार केली आहे. यामुळे पावसाळ्यात दरवर्षी हीच समस्या उद्भवते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक रहिवाशांनी नगरपालिका प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली आहे. गटारे मोठी करावीत आणि त्यांची वेळोवेळी साफसफाई करावी, अशी प्रमुख मागणी नागरिकांकडून होत आहे. गटारांच्या या दुरवस्थेमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली जात आहे.