अतिवृष्टीमुळे कागल तालुक्यात २ लाखांचे वर नुकसान; ९ घरांची पडझड, शेतीचेही नुकसान!

कागल (सलीम शेख ) : कागल तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एकूण २ लाख १७ हजार रुपयांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार कार्यालयाने दिली आहे. यामध्ये नऊ घरांची पडझड झाली असून, शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले असून, त्याचे अहवाल कागल तहसीलदार कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.
घरांच्या पडझडीचे झालेले नुकसान
मुंगळी, ता. कागल: सागर काकासो कांबळे यांच्या घराची पडझड झाली असून, अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. व्हन्नूर, ता. कागल आत्माराम दगडू खाडे यांच्या घराची भिंत अंशतः पडल्याने ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.आणूर, ता. कागल हिंदुराव लक्ष्मण आरडे यांच्या गोट्याची पडझड झाली असून, ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कापशी पैकी कोल्हेवाडीत शिवाजी विठ्ठल सावंत यांच्या घराची पडझड होऊन ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कापशी पैकी कोल्हेवाडीत भीमाशंकर नवाळे यांच्या घराची भिंत पडून ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोनगेत निवास चंद्रकांत शिंदे यांच्या घराची भिंत कोसळून ७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या सहा घटनांमध्ये मिळून एकूण २ लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
घरांच्या नुकसानीसोबतच शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. कागल येथील कमल बाळासो पाटील यांच्या गट नंबर ११५ मधील ५० गुंठे उडीद पिकाची उन्हाळी लागवड पूर्णपणे वाया गेली आहे. विशेष म्हणजे हे पीक पुन्हा उगवून आले असले तरी, त्याचाही पंचनामा तलाठ्यांनी केला आहे. याव्यतिरिक्त, कागल तालुक्यातील अवचितवाडी येथील शेतकरी संभाजी गायकवाड यांच्या केळीच्या बागेचेही अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे.
या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना आणि कुटुंबियांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महसूल विभागाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच नुकसान भरपाईची मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.